बदलापूर प्रकरणी सहआरोपी असलेले शाळेच्या विश्वस्तांना अटक

मुंबई : बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या शाळेच्या दोन विश्वस्तांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. सुमारे दीड महिन्यांनी ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी ही अटक केली आहे.
याआधीच उच्च न्यायालयाने या आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना अटक करण्यात झालेल्या दिरंगाईवरून राज्य सरकार आणि पोलिसांची कानउघाडणी केली होती.
बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर (सोमवारी) गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच दोघेही आरोपी महिनाभरापासून फरार झाले होते. आता या दोघांना पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या दोघांना आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर हे दोन्ही पदाधिकारी फरार झाल्यामुळे संतप्त नागरिकांकडून प्रशासनावर टीका केली जात होती. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे.