शिवसेना ही सुंदर स्त्री, मंगळसूत्र नसल्यामुळे कोणीही शिट्या मारेल
चिपळूण : विधानसभा निवडणुकीत अापआपल्या पक्षातफे उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक जण जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत: च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
‘शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल’, असं विधान शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
रत्नागिरीतील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु होती शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे चिपळूण विधानसभा मतदार संघातून इच्छूक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. शेखर निकम यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
याबाबत चव्हाण म्हणाले होते की, “चिपळूण मतदार संघातून उमेदवारी मिळावी, ही सुरवातीपासून इच्छा होती. त्यानंतर पक्षाने गुहागरमधून उमेदवारीबाबत विचारणा केली. त्याप्रमाणे आपण पक्षाला तयारीही दर्शवली होती. परंतू आता मतदार संघात शिवसेनेची ताकद असतानाही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असणे साहजिकच आहे. परंतू आता महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.”