महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र किंवा बीड बिहारसारखं करायचं आहे का : संभाजीराजे

बीड : बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यातील अारोपी अद्याप पोलिसांना सापडत नसल्याने राज्यात संतापाचे वातावरण आहे. आज अारोपींच्या अटकेसाठी बीडमध्ये विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चामध्ये राजकीय नेते देखील सामील झाले आहेत. स्वराज पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी देखील बीडमधील या मूक मोर्चामध्ये उपस्थिती लावून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. तसेच या खून प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आलेले आहे. मात्र त्याला देखील अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये निकटचे संबंध असून यामुळे त्याला अटक केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी अद्याप मोकाट असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश टाकला असून रोष व्यक्त केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “हे घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे, क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे वेदनादायी आहे. वाईट आहे, जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही. वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत संभाजीराजे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “हा विषय संवेदनशील असल्यामुळे या मिनिटाला भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी जे स्टेटमेंट केलय, त्या संदर्भातील माहिती एसपींकडे दिलीय” “आज महाराष्ट्र किंवा बीड बिहारसारखं करायचं आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या की, वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. अनेक व्यवहारात त्यांची भागीदारी आहे. वाल्मिक कराड कुठे लपला आहे, ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही मंत्री म्हणून अटक करण्याची जबाबदारी घेत नाही. मुख्यमंत्री म्हणतात मोक्का लावणार ते चालणार नाही. तात्काळ अटक करा, मोहरक्या वाल्मिक कराडला आत कसं घेणार, त्यावर बोला” अशा कडक शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

पुढे संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “माझी पहिली मागणी, मी महाराष्ट्रातला एकमेव नेता होतो, मी स्पष्टपणे सांगितलेलं, अजित पवारांना सांगितलेलं यांना मंत्रिपद देऊ नका. आज अजित पवारांसमोर गोष्टी आहेत. हा कुठल्या जातीचा मोर्चा नाही, तरी तुम्ही यावर का बोलत नाही? महाराष्ट्रामध्ये भीषण स्थीती आहे. यावरुन मला बोलायला लाज वाटत आहे,” असा घणाघात संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button