…म्हणून नणंदेने प्रियकराच्या मदतीने काढला भावजयचा काटा
जळगाव : आईच्या जागेवर भावजयीऐवजी आपण अनुकंपावर लागावे म्हणून नणंदेने प्रियकराच्या मदतीने सकाळी भावजयचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या दोघीही शौचालयास गेल्या होत्या. नणंद घरी परतली, मात्र भावजय घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली.
अमळनेर शहरातील गांधीपुरा भागात राहणाऱ्या शितल जय भोगले, वय ३५, राहणार मेहकर कॉलनी अमळनेर असं मृत विवाहितेचं नाव आहे. त्या पती आणि सासू यांच्यासोबत राहत होत्या. रविवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान नेत्र कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल गोखले यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या नणंदेला आणि तिच्या प्रियकराला या दोघांना केली आहे.
मृत शितल जय भोगले यांची सासू पारूबाई परशुराम घोगले, वय ५५ या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असतो. त्यामुळे सासू पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागेल, तिच्या ऐवजी मुलगी म्हणूनच आपल्या आईच्या जागी कामावर आपणच लागलं पाहिजे, असा विचार मृत शितल यांच्या नणंद मंगलाबाईचा होता.
याच रागातून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी शौचालयासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. नंतर मुलगी मंगला घरी परतली, मात्र शितल घरी आली नाही. बराच वेळा झाला ती कुठेही दिसली नाही. तिची शोधाशोध सुरू झाली. नंतर काटेरी झुडपात शितल यांचा मृतदेह आढळून आला.
सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिसांचा संशय बळवला
पोलिसांनी मृत शितल यांच्या नणंदेची विचारपूस केली असता तिने मी पाच मिनिटांतच बाहेरून घरी परत आली असं सांगितलं. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तब्बल २५ मिनिटांनी ती परत येताना दिसली आहे. तसंच तिचा प्रियकर असल्याचीही माहिती मिळाली. तिला याबाबत विचारलं असता तिने त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असं सांगितलं, मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि हत्येच्या रात्री देखील तिच्या प्रियकराशी बोलली असल्याचं समोर आलं. दोघांवरील संशय बळावल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत दोघांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी मंगलासह तिचा प्रियकर करण मोहन गटायडे, वय ३४, राहणार आयोध्या नगर, या दोघांनी शितल यांचा गळा दाबून, नंतर दगडाने डोक्यावर, हातावर आणि गळ्यावर वार करून हत्या केल्याचं समोर आलं. दोघांना अटक करण्यात आली आहे.