…तर पवार कुटुंब येऊ शकते एकत्र : सुनंदा पवार
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनंदा पवार यांनी, “कालची भेट कौटुंबिक होती. शरद पवार ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आले होते. दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबिय शरद पवारांना भेटत असतो. आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.”असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावर त्यांनी याविषयी काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले. तसेच सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. त्यासोबतच “ जर मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा, असेही म्हणत त्यांनी निर्णय दोन्ही पवारांवर सोडला आहे.
पुढे सुनंदा पवार यांना शरद पवार यांनी सत्तेत जायला हवे का? असाही सवाल करण्यात आला. त्यावर “शरद पवार यांनी ६० वर्ष राजकारणात काढले आहेत. हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे किंवा करू नये, हे मी नाही सांगू शकत.” असे म्हणत तासात भूमिका यावेळी त्यांनी घेतली.
रोहित पवारांना पक्षात संधी मिळायला हवी का? असा प्रश्न विचारला असता सुनंदा पवार म्हणाल्या की, फक्त रोहित पवारच नाही तर इतरही जे तरूण नेते पक्षात आहेत, त्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी द्यायला हवी. यामुळे पक्ष आणखी चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो. रोहितसह आणखीही तरूण आमदार निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.