म्हणून सुजय विखे केले असे वक्तव्य, संजय शिरसाठ यांनी सांगितले कारण
शिर्डी : शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे”, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावरून अनेक प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान सुरुवातीला सुजय विखेंच्या वक्तव्यावर टीका करणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आता सुजय विखेंच्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं दिसून येतंय. सुजय विखेंनी आपल्याशी चर्चा करून हा विषय समजावून सांगितला, आपला गैरसमज झाला असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. राज्यभरातील भिकारी शिर्डीत आणले जातात आणि त्यातील काही नशेखोर असल्याचं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलं.
संजय शिरसाट म्हणाले की, सुजय विखेंनी भिकाऱ्यांसबंधी जे वक्तव्य केलं त्याला मी सुरुवातीला विरोध केला. मात्र सुजय विखे यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर तो विषय स्पष्ट झाला. काही भिक्षेकरू हे शिर्डीत गाड्यांनी आणले जातात. त्यातील काही नशेखोर आहेत. ते व्हाईटनरची नशा करतात. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढते आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. खरं तर पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
दरम्यान, सुजय विखे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. साईभक्त आदरणीयच आहेत. पण पोलिसांकडे नोंद असलेले किती गुन्हेगार भिकाऱ्यांचं सोंग घेऊन तिथे आले आहेत ही आकडेवारी मी जाहीर करणार आहे. कधीही संस्थानकडे प्रश्न घेऊन गेलो की ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे प्रसादातून १० रुपये घेतल्याने जी काही बचत होईल त्याचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आणि त्या भूमिकेवर मी ठाम राहणार, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.