महाराष्ट्रराजकारण

जावई शिंदे गटात तर सासरे शरदचंद्र पवार गटात आमनेसामने

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाने बदलले समीकरण

पुणे : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असून, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे आमदार असल्याने हर्षवर्धन पाटील यांना महायुतीतून उमेदवारीची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली.

तर हर्षवर्धन पाटील यांचे जावाई निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सासरे आिण जावाई हे विरोध गटात बघायला मिळत आहे. निहार ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बिंदुमाधव यांचा १९९६ मध्ये अपघाती मृत्यू झाला. निहार ठाकरे राजकारणापासून दूर होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर निहार ठाकरेंनी त्यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला होता.

निहार ठाकरे हे व्यवसायाने वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस करतात. राजकीय कायदेशीर सल्लागार, कॉर्पोरेट व्यवहाराच्या कागदपत्रांची ड्राफ्टिंग, देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट ग्राहकांमध्ये तडजोडी करणे यासारखी कामे ते करतात.

हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कन्या अंकिता पाटीलही होत्या. हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन यांनी आपल्या समाजमाध्यमावर राष्ट्रवादी-शप पक्षाचे चिन्ह ‘तुतारी’चा फोटो ठेवल्याने पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी अटकळ आहे.

‘जनसन्मान’ यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये आमदार दत्ता भरणे हेच उमेदवार असतील, असे थेट जाहीर केले. त्या दिवसापासून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये विशेषतः इंदापूरमध्ये ठिणगी पडली. तेव्हापासून हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यानंतर पाटील नाराज असल्याचे दिसून आले. भाजपच्या अनेक बैठकांना त्यांनी दांडी मारली, कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याची विनंती करून ‘तुतारी’ हातात घेण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता ‘राष्ट्रवादी’ मध्ये जाणार आणि ‘तुतारी’ वाजविणार अशा चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्याबाबत शरद पवार किंवा अन्य कोणीही पदाधिकाऱ्यांनी जाहीररीत्या कोणतेही वक्तव्य केले नसल्याने पाटील यांच्यासाठी शरद पवार ‘राष्ट्रवादी’ची दारे उघडतील का, अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button