नवी दिल्ली : लेहहून दिल्लीत पोहचण्यासाठी निघालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांचे सुमारे 150 सहकाऱ्यांना सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. या कारवाईनंतर आम आदमी पार्टी मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. दिल्ली पोलिसांचा आदेश हा तुघलकाचा हुकूम आहे. असेही आपने म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी मंगळवारी सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी बवाना पोलीस ठाण्यात पोहोचले, मात्र त्यांना भेटू देण्यात आले नाही, असा पक्षाचा दावा आहे. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर लोकांनी निदर्शने केली. जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटू दिले जात नाही, तेव्हा सर्वसामान्यांची काय स्थिती आहे, असा सवाल आपचे आमदार जय भगवान यांनी उपस्थित केला आहे.
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
सोमवारी दिल्ली सीमेवर लडाखमधून मोर्चा काढून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या 150 लोकांना पोलिसांनी रोखले. सोनम वांगचुक आणि त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिल्लीतील सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाटावर आंदोलन करण्याची त्यांची योजना होती.
सोनम वांगचुकसह सर्व आंदोलकांना रोखण्यासाठी सिंगू सीमेवर शेकडो पोलिस तैनात करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी अनेक लेन नाकाबंदी करून फक्त एक लेन खुली ठेवली होती. त्यामुळे सिंघू सीमा मार्ग बंद करण्यात आला होता. उत्तर दिल्ली आणि मध्य दिल्लीत निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता कलम 163 लागू करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक का करत आहे विरोध?
सोनम वांगचुक 1 सप्टेंबर रोजी सुमारे 130 लोकांसह लडाख सोडले होते. यावेळी ते हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, मनाली, कुल्लू, मंडी, चंदीगड मार्गे दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचले. वांगचुक सातत्याने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.