शेतकरी संघटनेच्या पंजाब बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली : शेकडो शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर पिकांना किमान आधारभूत किंमत कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे उपोषणाचा ३५ वा दिवस आहे. तरी सरकार ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून पंजाब बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतकरी आंदोलनांतर्गत हा बंद सोमवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत असणार आहे.
अमृतसर, भटिंडा, लुधियाना, पटियाला या मोठ्या शहरांमध्येही बंदचा परिणाम दिसून येत आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.
अमृतसरच्या गोल्डन गेटवर शेतकरी येऊ लागले, तर भटिंडाच्या रामपुरा फुलमध्ये त्यांनी रास्ता रोको केला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसू लागला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पंजाबमधील सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आणि इतर अनेक मुख्य रस्ते आणि रेल्वे मार्ग शेतकरी संघटनांनी रोखून धरले आहेत. दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर विभागांना पाठवलेल्या परिपत्रकामध्ये उत्तर रेल्वेने 150 ट्रेन रद्द केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या पंजाब बंदमुळे राज्यातील सर्व दुकाने, भाजी मंडई, सरकारी व निमसरकारी कार्यालये, पेट्रोल पंप आणि गॅस पंप बंद राहणार आहेत. मात्र, मेडिकल स्टोअर्स आणि आपत्कालीन सेवा सुरू राहतील. याशिवाय विमानतळावर जाणाऱ्या लोकांवर, लग्नाची मिरवणूक, मुलाखत आणि परीक्षा यांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि, आपत्कालीन सेवा सुरू राहतील. विमान प्रवासासाठी विमानतळावर जाणाऱ्या, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा लग्नसमारंभासाठी जाणाऱ्यांना बंदच्या आवाहनातून सूट देण्यात आली आहे.
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना पाठिंबा
दरम्यान, शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल (70) यांचे आमरण उपोषण सोमवारी 35 व्या दिवशीही सुरूच आहे. डल्लेवाल यांनी आतापर्यंत वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. पंजाब बंदला शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ आहे. 13 प्रमुख कृषी मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते एका महिन्याहून अधिक काळ उपोषणाला बसले आहेत. या मागण्यांमध्ये सर्व पिकांसाठी एमएसपीची कायदेशीर हमी देखील समाविष्ट आहे.
शेकडो शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर पिकांना किमान आधारभूत किंमत कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे डल्लेवाल यांनी यापूर्वीच सांगितले होते. हायकोर्टाने पंजाब सरकारला 31 डिसेंबरपर्यंत डल्लेवाल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास राजी करण्यासाठी वेळ दिला आहे, तसेच राज्यालाही गरज भासल्यास केंद्र सरकारकडून मदत घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.