शिंदेवर टिका करत ठाकरे यांना देवमाणूस म्हणणारे श्रीनिवास वनगा पुन्हा शिंदेच्या नेतृत्वात

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारलेल्या ४ ० आमदारांपैकी एक असलेल्या श्रीनिवास वनगा यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या वनगा यांनी दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर परखड शब्दांत टीका केली होती. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना देवमाणूस संबोधले होते. मात्र, चार दिवसांनंतर घरी परतलेल्या वनगा यांची नाराजी आता ओसरल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले होते, यामुळे ते प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पत्रकार परिषदेत अश्रू ढाळत उद्धव ठाकरेंचं कौतुक करणारे वनगा घरातून गायब झाले. यामुळे त्यांचे कुटुंबियांसह कार्यकर्ते चिंतेत होते. विविध ठिकाणी शोध घेऊनही दोन दिवस ते कुठे गेले याचा पत्ता लागला नव्हता. अखेर ते घरी परतल्यावर त्यांनी काही खुलासे केले आहेत.
वनगा यांनी त्यांच्या तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याचे कबूल केले, मात्र ठाकरे गटाशी आपला कोणताही संपर्क नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. पक्षातील काही नेत्यांनी त्यांचे तिकीट कापण्यासाठी षडयंत्र रचले असून मुख्यमंत्री शिंदेंनी यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे कौतुक करताना, त्यांना “देवमाणूस” म्हणणारे वनगा आता शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे सांगतात. उद्धव ठाकरेंबद्दल चांगले मत असूनही, त्यांनी पक्ष बदलण्याची मनस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघात विशेष कामे न झाल्याचे त्यांनी नमूद केले आणि एकनाथ शिंदेंमुळेच १२०० कोटींचा निधी मिळवता आला, असेही ते म्हणाले.