महाविकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष थेट अजित पवार यांच्या भेटीला
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. त्यातच आता सरकार स्थापनेसाठी महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहे. यातच समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. अबू आझमी हे ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर अजित दादांच्या भेटीला गेले. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केलेल्या आरोपांविषयी चर्चा करण्यासाठी गेल्याचा दावा आझमींनी भेटीनंतर केला.
राजभवनावर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, महाविकास आघाडीत वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबू आझमी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली. परंतु, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्यावर गुन्हेगारीचे आरोप लावले ते चुकीचे होते. गंभीर आरोप त्यांनी केले, मानखुर्दला बदनाम करणारे आरोप त्यांनी केले, मी ही परिस्थिती सुधारली जावी यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, समर्थनाचा मुद्दा नाही, त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली.
आघाडीमध्ये समनवयाची कमी असल्याने अपयश आले. एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वारंवार दिल्लीत जाऊन चर्चा करायची गरज काय जेव्हा राज्यातील कांग्रेस नेते सक्षम होते, असंही अबू आझमी म्हणाले.