कोरेगाव भीमा पोलिसांकडून कडक बंदोबस्त, पुणे-नगर मार्गात बदल
पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त बुधवारी (१ जानेवारी) ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून चार हजार ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. ‘विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या, तसेच गर्दीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे,’ अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे या वेळी उपस्थित होते. ‘गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. घातपाती विरोधी पथके तैनात राहणार आहेत,’ असेही देशमुख यांनी नमूद केले. ‘बंदोबस्तासाठी ३३६ पोलीस अधिकारी, तीन हजार ८० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दीड हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) १२ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
अग्निशमन दलाचे जवानही तेथे तैनात राहणार आहेत. आत्पकालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकदेखील असेल. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथून अनुयायांना विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच परतण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती देशमुख यांनी दिली.
नगर रस्त्याने येणाऱ्या अनुयायींच्या वाहनांसाठी शिक्रापूर (वक्फ बोर्ड) येथे ५९ एकर जागेवर वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर किमान आठ हजार वाहने लावता येतील, तसेच मुंबई-ठाणे परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेत किमान चार हजार ८०० वाहने लावणे शक्य होईल. पीएमपी बससाठी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडीत दहा एकर जागेत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथून अनुयायींना वढू बुद्रुक येथे जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा येथील इनामदार पार्किंगच्या ठिकाणी पीएमपी बस अनुयायांना सोडतील. डिग्रजवाडी फाटा परिसरातून परतणाऱ्या अनुयायांसाठी पीएमपी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल
पुणे, कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादनानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. हा वाहतूक बदल ३१ डिसेंबरच्या सायंकाळीपासून १ जानेवारी २०२५ रोजी रात्री बारापर्यंत असणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
असा आहे बदल…
– पुणे शहरातून नगर रोडने खराडी बायपास – वाघोली-लोणीकंद-थेऊर फाटा-तुळापुर फाटा- भिमा कोरेगांव, पेरणे गाव पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक वाहने वगळता) प्रवेश बंद करण्यात आला आहे.
– मरकळ नदी ब्रिज-तुळापुर फाटा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
– वाघोली केसनंद फाटा- केसनंद गाव -मगर वस्ती- खंडोबाचा माळ- लोणीकंद (थेऊर फाटा) पर्यंत सर्व प्रकाराच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे.
– सोलापूर रोड (थेऊर फाटा) -थेऊर गाव- कोलवडी-केसनंद गांव- मगरवस्ती- खंडोबाचा माळ- लोणीकंद (थेऊर फाटा) सर्व वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायर ब्रिगेड, पोलिस वाहने, रूग्णवाहिका, पीएमपीएल बस, अनुयायी व स्थानिक नागरिक इत्यादी वगळून) प्रवेश बंद.
– इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर रोडवरील मरकळ ब्रिज हा पुल जड वाहनांना हाईट बॅरिअर मुळे बंद करण्यात आला आहे. या ठिकाणहून केवळ हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांना बस, टेम्पो वाहनांनीच पुर्वीच चाकण-शिक्रापुर मार्गाचा वापर करावा.
– विश्रांतवाडी-लोहगाव-वाघोली व वाघोली- लोहगाव मार्ग विश्रांतवाडीकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना दि. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 दरम्यान बंद करण्यात येत आहे.