मला सांगा, तुम्ही मराठ्यांना आरक्षण कसे देणार.. राज ठाकरेंचा जरांगे यांना सवाल
लातूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी आज लातूरमधील जाहीर सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. त्यांनी मराठा आरक्षणावरून राज्यातील पक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच मराठा उपोक्षणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले,’मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे उपोषणाला बसले. त्यानंतर ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुका लढवणार, नंतर त्यांनी निवडणूक लढवणार नाही तर पाडापाडी करणार, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. यावर राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला निवडणुका लढवायची असेल तर लढवा, पाडायचं असेल तर पाडा …पण प्रश्न इतकाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, येवढं मला फक्त सांगा..’
ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा मोर्चा मुंबईत आला होता, तेव्हा व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते बसले होते. यावेळी चारही पक्षांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मग आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मी मराठा समाजाचे इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात कधी पाहिले नव्हते, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याची भूमिका जाहीर केली.