दहा अपक्ष उमेदवारांचा समीर भुजबळ यांना पाठिंबा
नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज मागे घेत माजी खासदार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून उभे आहेत.
गेल्या काही दिवसापासून नांदगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ यांनी चांगलीच तयारी केली आहे. नांदगाव जनतेच्या आग्रहाखातर माजी खासदार भुजबळ यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नांदगावचे राजकीय वातावरणात बदल दिसून येत आहे. मतदारसंघाच्या विकासाची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे
चिन्ह वाटपाच्या वेळेस समीर भुजबळ यांना शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे भुजबळांच्या कार्यालयात शिट्टीचा एकच जल्लोष झाला. आता कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करीत विकासाची शिट्टी आता वाजविणार आहे. जनतेने आपले बहुमोल मत माझ्या शिट्टी या निशाणीला देऊन मला विजयी करावे, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले आहे.
नांदगावच्या विकासासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून ‘भय’ हद्दपार करण्यासाठी मी माघार घेत माझा पाठिंबा समीर भुजबळ यांना देत आहे, असे उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या भगवान सोनवणे यांनी म्हटले आहे.