
बंगळुरु: बंगळुरु येथील २९ वर्षीय महालक्ष्मीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करणारा आरोपी मुक्ती रंजन प्रताप रे यानेही आपलं आयुष्य संपवलं. त्याचा मृतदेह ओदिशात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या घटनेने वेगळेच वळण घेतले. मृत आरोपी मुक्ती रंजनच्या भावाने दावा केला की मुक्तीचं महालक्ष्मीवर खूप प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र, महालक्ष्मीने त्याच्यावर अपहरणाचा आरोप करत त्याची पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटकही केली होती.
मुक्तीचा भाऊ सत्यरंजन रॉयने सांगितले की, मुक्तीला महालक्ष्मीसोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे तो तिला बाईकवरुन केरळला घेऊन जात होता. पण, महालक्ष्मीने त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला आणि लोकांनी तिला मारहाण केली. लोकांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर १००० रुपयांची लाच दिल्यानंतर त्याला सोडून दिलं, असा दावा सत्यरंजनने केला. महालक्ष्मीने तिच्या मित्रांसह मिळून मुक्तीला धमकावलंही होतं, त्यामुळे रागाच्या भरात मुक्तीने तिचा गळा दाबून खून केला, असंही त्याने सांगितलं.
मुक्ती रंजन प्रताप रे यांनी महालक्ष्मीला का मारले?
ओडिशा पोलिसांचे म्हणणे आहे की 31 वर्षीय मुक्ती रंजन प्रताप रे हे महालक्ष्मीसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि महालक्ष्मी तिच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते, त्यातून मुक्ती रंजनने महालक्ष्मीची हत्या केली. बेंगळुरूमध्ये पोलिस उपायुक्त (मध्य) शेखर एच टेक्कन्नवर यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी एक व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळली. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या ठिकाणाहून सापडलेल्या कथित सुसाईड नोटमधून मुक्ती रंजन प्रताप रे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध कसा लावला?
ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण आणि कॉल रेकॉर्ड डिटेल्सची मदत घेतली. सुरुवातीला त्याचे मोबाइल लोकेशन पश्चिम बंगालमधील असल्याचे आढळून आले, परंतु नंतर त्याने ते बंद केले. तथापि, तांत्रिक देखरेखीच्या मदतीने, त्याचे स्थान ओडिशातील एका गावात शोधण्यात आले, जिथे आम्ही त्याला पकडण्यासाठी आमचे पथक पाठवले. त्याने ओडिशातही आपली जागा बदलली. नंतर आरोपी झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.