देश-विदेशभारत

संभल हिंसाचारावरून राजकीय वातावरण तापले, विरोधकांची सरकारवर टीका

लखनौ : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील संभल जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात झालेल्या मृत्यूंना हत्या असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा गोळीबार नसून खून असल्याचे सांगितले. सर्वेक्षणाची माहिती मशीद समितीला का देण्यात आली नाही, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.

असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी, “ज्या हिंसाचारात तीन मुस्लिमांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, त्याचा आम्ही निषेध करतो. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘ही गोळीबार नसून हत्या आहे आणि राम मंदिराचा निकाल आल्यापासून मी विशेष सांगतोय की त्या निकालानंतर या सर्व गोष्टी उघड होतील आणि एकामागून एक उघड होत आहेत. तुम्ही त्याचे धार्मिक स्वरूप बदलू शकत नाही असे ASI कायद्यात नाही का? हे तुम्ही कशाच्या आधारावर करत आहात आणि कशाच्या आधारावर तुमची श्रद्धा इतरांवर लादणार आहात, काही कायदा आहे की नाही?असा प्रश्न यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे त्यांनी आरोप केला की, ‘न्यायालयात ज्या दिवशी सुनावणी होते, त्याच दिवशी आदेश होतात आणि त्याच दिवशी सर्वेक्षणही केले जाते. 1948 मध्ये बाबरी मशिदीत हा प्रकार घडला होता. त्यामुळे झालेला हा गोळीबार गोळीबार नसून खून आहे. यात जे अधिकारी सहभागी आहेत, त्यांना निलंबित करून उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी.” असेही त्यांनी येवेळी म्हटले.

नगीनाचे खासदार आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे सोमवारी म्हणजेच आज संभल येथे जाऊन हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या वादावर राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘उत्तर प्रदेश संभलमध्ये नुकत्याच झालेल्या वादावर राज्य सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना’ आहे.

काय आहे प्रकरण
संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर असल्याची याचिका महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी १९ नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने सर्व्हे करून व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सर्व्हे करणारी टीम मशिदीत पोहोचताच बाहेर जमलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यात उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यासह २० जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्ती, सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. एवढेच नाही तर संभल आणि परिसरातील शाळा २५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button