डॉक्टर तरुणीने घेतली नदीत उडी, आत्महत्येपूर्वी काढले व्हिडीओ

चंद्रपूर : वडसा- ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून महिला डॉक्टर ईशा घनश्याम बिंजवे (२४) हिने उडी मारून आत्महत्या केल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर ईशा हिचे आत्महत्या करतानाचे काही व्हिडीओ समाजमाध्यमात सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे या आत्महत्येबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध डॉक्टर घनश्याम बिजवे याची डॉक्टर कन्या डॉक्टर ईशा हिने मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती रात्री उशिरा कुटुंबाला कळताच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी शोधा -शोध सुरू केली. डॉ. ईशा हिला नदीच्या पात्रात उडी घेताना अनेकांनी पाहिले. मात्र तिचा बचाव करायला कुणीही समोर आले नाही. विशेष म्हणजे या आत्महत्येचा व्हिडीओ देखील चित्रित केला गेला. मात्र तिला वाचविण्यासाठी नदी पात्रात कुणीच उडी घेतली नाही. दरम्यान तिचा शोध घेणे सुरू असतानाच बुधवार १७ जुलैला पिंपळगाव (खरकाळा) वैनगंगा नदीच्या तीरावर मृतदेह मिळाला. डॉ. ईशा बिजवे तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहे. सदर मुलगी उच्च शिक्षित घरची आहे. तिचे आई- वडीलसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांच्या परिवारात आई, बाबा, भाऊ व वहिनी आहे. तिच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूचे कारण कळले नाही. पुढील तपास वडसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताब यांच्या मार्गदर्शानाखाली सुरू आहे.