क्राइममहाराष्ट्र

तीन शिक्षकांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नकाे ते व्हिडीओ दाखवायचे

मुंबई : खासगी क्लासेस चालविणाऱ्या तीन शिक्षकांनी गेल्या वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केला. वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक छळ केल्याचे उघडकीस येताच या तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सदर मुलींच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तिचे निवासस्थान आणि त्याचबरोबर शाळा बदलली. या सर्व परिस्थितीमुळे ती घरात शांत शांत राहू लागल्याने आईने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला एका स्वयंसेवी संस्थेत समुपदेशनासाठी पाठवले. समुपदेशनादरम्यान महिलांनी या मुलीला आपलेसे करत पुन्हा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असताना धक्कादायक घटना समोर आली.

जवळपास सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत समुपदेशन करणाऱ्यांना तसे काही जाणवले नाही. दुसरीकडे, समुपदेशन करूनही तिच्या वागणुकीत काही बदल झालेला दिसत नव्हता. परीक्षेमुळे काही दिवस गैरहजर राहिलेली ही मुलगी पुन्हा समुपदेशनासाठी येऊ लागली. यावेळी स्वयंसेवी संस्थेतील महिलेने तिच्या आईकडे अधिक खोलात जाऊन तिच्याबद्दल माहिती घेतली. त्यावेळी खासगी क्लासमधील एका शिक्षकासोबत ती चॅटिंग करीत असून अभ्यासाव्यतिरिक्त अनेक खासगी बाबी सांगत असल्याचे आईने सांगितले.

आईने दिलेल्या नवीन माहितीनंतर समुपदेशन करणाऱ्यांनी आपली दिशा बदलली आणि मोर्चा घरातून खासगी क्लासेसच्या दिशेने वळविला. आस्थेने या मुलीला आपलंस करीत तिच्याकडे क्लासबाबत विचारणा केली. त्यावेळी शिकवणी घेणाऱ्या तीन शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. हा घृणास्पद प्रकार जवळपास वर्षभरापासून सुरू होता.

अल्पवयीन असतानाही तिला प्रौढांचे चित्रपट दाखवणे, सकाळी लवकर किंवा सायंकाळी शिकवणी संपल्यानंतर सर्व विद्यार्थी गेल्यानंतर तिला थांबून ठेवून शिक्षक लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने सांगितले आणि रडू लागली. तिची आपबिती ऐकून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यांनी हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. मात्र, बदनामीच्या भीतीने दोघेही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोक्सो, बलात्कार यासह इतर कलमांतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. या प्रकारामुळे मुलगी आणि तिची आई खचून गेल्या असून क्लासमध्ये येणाऱ्या इतर मुलीही धास्तावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button