क्राइममहाराष्ट्र

बाबा सिद्दीकींच्या हत्यामागे ही आहे कारणे, मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा

मुंबई : राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी लाँरेन्स बिष्णोई गँगमधील मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची बिष्णोई गँगने हत्या 3 कारणांसाठी करण्यात आल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र 4590 पानांचे आहे. मुंबई पोलिसांनी एकूण 26 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी 3 आरोपी फरार आहेत. यामध्ये अनमोल बिष्णोईचेही नाव आहे. मुंबई पोलिसांनी 210 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणाच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी हत्येचे कारणही नमूद केले आहे.

का करण्यात आली हत्या?
बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी बिष्णोई गँगकडे तीन प्रमुख कारणे होती. यामध्ये अभिनेता सलमान खानसोबतची जवळीक हे प्रमुख कारण होते. तर, दुसरं कारण हे कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुज थापनचा बदला घेणे आणि तिसरं कारण म्हणजे बिष्णोई गँगची दहशत प्रस्थापित करण्यासाठी सिद्दीकींची हत्या करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

कोण होता अनुज थापन
अनूज थापन हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर होता. १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकऱणात अनूज थापन हा आरोपी होता. अनूज थापनने गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना बंदूक पुरवली होती. तर २४ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अनूज थापनला पंजाब येथून अटक केली होती. तर १ मे रोजी अनूज थापनचा मुंबई पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. अनूज थापनने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, त्याने आत्महत्या केली नाहीतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.

‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी यांचे पुत्र आणि तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्वेतील कार्यालयाबाहेरच हा गोळीबार झाला होता. रात्री नऊच्या आसपास बाबा सिद्दीकी कार्यालयातील कामकाज उरकून आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या तीन जणांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. दसऱ्याच्या दिवशी ही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button