धारावीची एक लाख कोटीची जमीन अदाणींना द्यायची म्हणून ठाकरे सरकार पाडले : राहुल गांधी
अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. आज शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी अमरावतीत दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गौतम अदाणी, अमित शाह यांची बंद खोलीत बैठक पार पडली होती. या बैठकीत धारावीच्या जागेच्या बदल्यात आमदार विकत घेण्याचा सौदा झाला आणि राज्यातील जनतेचं सरकार पाडण्यात आलं. धारावीची एक लाख कोटीची जमीन त्यांना अदाणींना द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात आलं.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे बघून अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आठवण येते. तेही अनेकदा गोष्टी विसरायचे, त्यांच्या बाजुला असलेल्या व्यक्तीला त्यांना आठवण करून द्यावी लागत होती. आम्ही बोलतो तेच गोष्टी पंतप्रधान मोदी बोलतात. त्याच त्या गोष्टी परत परत सांगतात. त्यांना आता स्मृतीभ्रंश झाला आहे. एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी त्यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून संबोधले. नंतर अधिकाऱ्यांनी ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे त्यांना सांगितलं. आता पंतप्रधान मोदीही याच मार्गाने जात आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
“ज्यावेळी महाराष्ट्रातील सरकार चोरी करण्यात आलं. तेव्हाही अशाचप्रकारे बंद खोलीत बैठक पार पडली होती. या बैठकीला अदाणी, अमित शाह होते. या बैठकीत धारावीच्या जागेच्या बदल्यात आमदार विकत घेण्याचा सौदा झाला आणि राज्यातील जनतेचं सरकार पाडण्यात आलं. अशाप्रकारे हे लोक संविधानाचं रक्षण करतात का? सरकार पाडा असं संविधानात लिहिलं आहे का? मुळात हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. धारावीची एक लाख कोटीची जमीन त्यांना अदाणींना द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात आलं”, असा आरोपही त्यांनी केला. धारावीची जमीन घेता, मग कुलाब्याची जमीन का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला.