गांजाची तस्करी करणारे दोघे अटकेत; ६३ किलो गांजासह वाहन, मोबाइल जप्त
छत्रपती संभाजीनगर : गांजाची विक्रीसाठी तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई २० जुलै रोजी चिकलठाणा परिसरात करण्यात आली. विजय सांडू गायकवाड (३१, रा. कुंभेफळ, शेंद्रा) आणि करण शिवाजी जाधव (१९, रा. वसंतनगर, जाधववाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ६३ किलो ८२२ ग्रॅम गांजा, पिकअप आणि दोन मोबाईल जप्त केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
दोघेजण महिंद्रा पिकअप (एमएच-२०-जीसी-५८१५) या वाहनांतून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने महाल पिंप्री ते चिकलठाणा रोडवर सापळा रचला. गायकवाड आणि जाधव हे दोघे पिकअप घेऊन येताच पथकाने त्यांना थांबवून झडती घेतली. तेव्हा वाहनात गांजाच्या गोण्या आढळून आल्या. पथकाने त्यांच्याकडून १५ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा ६३ किलो ८२२ ग्रॅम गांजा, पिकअप, दोन मोबाईल असा २१ लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मागर्दशनाखाली सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, परभत म्हस्के, प्रकाश डोंगरे, धर्मराज गायकवाड, विनय भानुसे, मनोहर गीते, संतोष भानुसे आणि संतोष चौरे यांनी केली.