धाराशिवच्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव :- लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलार पॅनलची वायर चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मध्ये लातूर जिल्ह्यातील तीन तर धाराशिव व बीड जिल्ह्यातील तीन अशा ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील मुरुड व किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी सोलार पॅनलची वायर चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्त्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून तपास करण्यात येत होता. रविवार, (दि.२५ ऑगस्ट) रोजी सायंकाळी काही गुन्हेगार चोरीच्या उद्देशाने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तांदूळजा गावातून रेकी करणाऱ्या शिवाजी वाप्पा काळे (वय २९) व मुरलीधर अन्सरा काळे, (वय ४५, दोघेही रा.कासार खणी, ता. वाशी, धाराशिव) या संशयितांना वोलेरो जीपसह ताब्यात घेतले. जीपची व त्यांची झडती घेतली असता, दोघांकडे तीन लाख रुपये आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह काही महिन्यांपासून मुरुड व किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागेतील मोठ्या सोलार पॅनलची वायर कापून चोरल्याचे कबुली दिली. त्यांच्या आणखीन एका साथीदाराने वायर जाळून त्यातील कॉपर भंगारमध्ये विकल्याचे व त्यातून दोघांच्या हिश्याला आलेली आपणाकडे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील रक्कम व गुन्ह्यात वापरलेली जीप असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना पुढील कारवाईसाठी मुरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार रामहरी भोसले, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, नानासाहेव भोंग, राजेश कंचे, सुरेश कलमे, पोलीस चालक अंमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी ही कारवाई केली आहे.