यामुळे कोसळला राजकोट येथील शिवरायांचा पुतळा? खा.उदयनराजेंनी सांगितली दोन कारणे

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याच्या बांधणी आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत राज्य सरकारवर जोरदार टीका केली जातेय. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी, घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत कोणीही राजकारण करु नये असे आवाहन केलंय.
सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या दुर्घटनेमागे कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा ही प्रमुख कारणे असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. हीच 2 प्रमुख कारणे असून कोणीही या घटनेचे स्वतःच्या लाभासाठी भांडवल करू नये. या घटनेत विशेष कोणाला लक्ष बनवणे टाळले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये घटनेत दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. आणि समुद्र तटीय निसर्ग नियमांचा आणि वातावरणाचा बदलाचा पुरेपूर अभ्यास करून छत्रपती शिवरायांचा प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
राजकोट मधील पुतळा दुर्घटना ही निश्चितच दुर्देवी आणि अचानक घडलेली घटना आहे. देशातील सर्व जाती धर्मातील नागरीकांमध्ये या घटनेचे दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये, विशेष कोणाला लक्ष बनविणे टाळले पाहीजे. असे आवाहन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजच्या घडीला सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या कर्तुत्वामधुन प्रेरणा घेवून करोडो व्यक्तींनी आपल्या जीवनाची आदर्शदायी वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्प आयुष्यातील, अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दिपस्तंभासारखे आहे. सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणाऱ्या अशा थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे. या घटनेच्या सखोल चौकशी अंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठार शासन व्हावे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळया त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहीजे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत नमुद केले आहे.