महाराष्ट्रातील विद्यापीठाला देण्यात आले रतन टाटांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यात लवकरच आचारसंहिता लागणार असून या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडका सुरु आहे. या बैठकींमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. आज मंत्रीमंडळाची शेवटची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये सरकारने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला. या निर्णयाला मंत्रिमंडळाने संमती दर्शवली असून याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
या विद्यापीठाबद्दल बोलायचे झाल्यास याची मुंबई आणि पुण्यात स्थापना करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी ‘स्किल इंडिया मोहिमे’ची घोषणा केली. त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमिपूजन समारंभ अलिबागमध्ये 2023 मध्ये पार पडला.
या विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कॉम्पुटिंग, उद्योग 4.0, बांधकाम व्यवस्थापन या विषयांमध्ये एम. टेक. अभ्यासक्रम तसेच बिझनेस ऍनालिसिस या विषयात एम एस्सी. अभ्यासक्रम, एमबीए तसेच विविध आधुनिक विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.