
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराड याच्या खंडणी, फसवणूकीचे अनेक चुरस किस्से बाहेर येत आहे. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्तीय असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्व 140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. वाल्मिक कराड याने एकूण अकरा कोटी वीस लाखाची फसवणूक केली आहे. त्यानंतर आता यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या 19 मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून त्यांच्याकडून तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असून या 11 कोटी 20 लाखांची फसवणूक झालेल्या सर्व मशीनधारकांना त्यांच्या जवळील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड, जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले
ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास 140 शेतकरी मशीन धारकांना 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्तीय असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्व 140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. यासाठी 14 सप्टेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गोप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांचा आहे.
19 शेतकऱ्यांचा जबाब नोंदवला
पालघरच्या एका हॉटेलमध्ये पैसे मोजून देतानाचे फोटो आणि मुंडे यांच्या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. यातील एका फोटोत जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे. या तक्रारदारांकडे प्रत्येक नोटीचे नंबर आणि व्हिडिओ देखील असून अनेकांनी कर्ज काढून आणि सावकाराच्या माध्यमातून हे पैसे उभा केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष हुंबे यांनी श्रीकांत नागणे, दिलीप नागणे यांच्यासह 19 जणांचे जबाब काल रात्री उशिरा नोंदवले आहेत. या सर्वांचे तक्रारी अर्ज देखील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पुरावे सादर करण्याची सूचना पोलिसांनी या शेतकऱ्यांना दिलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवरून तपास करावा
आता या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला असून राज्यातील विविध भागातील हे तक्रारदार असल्याने आता राज्यात अनेक ठिकाणी हे तक्रारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या प्रकाराची व्याप्ती मोठी असून या त अनेक जण सामील असल्याने याचा वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांनी तपास करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज दादा जरांगे यांच्याही कानावर हा सर्व प्रकार घातला असून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.