मनोरंजनराजकारण

सैफ नव्हे तर तैमूरला मारायचे होते, कारण सांगत जितेंद्र आव्हाडाचा खळबळजनक दावा

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरी चाकूने हल्ला झाला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले, त्यांच्या मानेला, हाताला आणि छातीला दुखापत झाली. हल्लेखोराचा अद्याप शोध सुरू आहे. पोलिसांनी एका संशयिताची चौकशी केली परंतु तो निर्दोष असल्याचे आढळले. सैफ अली खान सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत.

सैफ अली खानवर गुरुवारी लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र या घटनेनंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा दावा केला आहे.

सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला होऊन तो बचावला. मात्र हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमूर याला मारायचं होतं आणि तोही या हल्ल्यातून बचावला आहे. सत्य कोणीच सांगणार नाही. सत्य सांगायला कोणी पुढे येणार नाही. तैमूरच्या नावामुळे त्याचा द्वेष केला जातो, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर त्याच्या मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. सैफ व करीनाचा मुलगा तैमूर हा समाजमाध्यमांमध्ये व जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून, प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात.”

पुढे आव्हाड म्हणाले, “तैमूर हे नाव देखील पौराणिकच आहे. त्याचा अरबी भाषेत चांगला अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ असा तैमूरचा अर्थ आहे. त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचं लक्ष्य बनला होता. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे.” असा मोठा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केल्याने सध्या त्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button