मोदी-मोदी करून अमित शाह यांना स्वर्ग मिळणार आहे का? : उद्धव ठाकरे
मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि ‘आरएसएस’वर संताप व्यक्त केला आहे.
“भाजपच्या हृदयातील काळं बाहेर आलं आहे, देशानं अन् महाराष्ट्रानं शहाणं व्हावं. मोदी-मोदी करून अमित शाह यांना स्वर्ग मिळणार आहे का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपाचा बुरखा फाडला
‘अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत अपमान केला त्यामुळे भाजपाचा बुरखा फाटला आहे. आंबेडकरांना कोणत्याही पक्षाची सीमा लागू होत नाही. ज्यांनी आम्हाला संविधान दिलं, त्यांचा अपमान आम्हाला मंजूर नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या विषयावर भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी अमित शाहांवर काय कारवाई करणार हे सांगावं,’ असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं.
पंतप्रधान मोदी अमित शाहांवर काही कारवाई करणार का? की, मोदींनीच अमित शाहांना हे सांगण्याची सूचना केली होती? असा सवाल ठाकरे यांनी विचारला तोडा-फोडा आणि राज्य करा हेच भाजपाचं हिंदु्त्व आहे, असा टोला ठाकरे यांनी केला. नेहरु-नेहरु करता-करता हे आता आंबेडकरांवर बोलायला लागले आहेत, इतकी यांची हिंमत वाढलीय, असं ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे नेते, मित्रपक्ष आता काय भूमिका घेणार? हा माझा प्रश्न आहे. एनडीएमधील नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू काय करणार? महाराष्ट्रातील त्यांचे मित्रपक्ष असलेले रामदास आठवले काय करणार? आठवले केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.