नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतले प्रतिज्ञापत्र, ठाकरे यांना पक्षफुटीची भिती
मुंबई : विधानसभा निवडणूकीत राज्यात भाजप महायुतीने तब्बल २३१ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर मविआला विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. यातच ऐतिहासिक बंडखोरीतून मोठा धडा घेत ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीच्या सत्तास्थापनेपुर्वीच शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मोठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते. मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत.
उध्दव ठाकरेंनी या विधानसभा निवडणुकीत ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते. पैकी केवळ २० ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळाले. यानंतर मातोश्री येथे सर्व नवनिर्वाचित २० आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरेंनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते आहे. या बैठकीत नवनिर्वाचित २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असून पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. पक्षफुटीचा मोठा अनुभव घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. तर विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे सभागृह नेते असणार आहेत, याबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली.