मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू : राणे
मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल
अहमदनगर : रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांनी आयोजन केले होते. यामध्ये हिंदू समाजातील अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी नितेश राणेंनी ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडकाऊ भाषण देणे आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुस्लिम समाजाला उघड धमकी दिली होती. एका एकाला पकडून मारु, असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात कलम 302, कलम 153 सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणेंविरोधात एक नव्हे तर दोन प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. पहिले प्रकरण श्रीरामपूर आणि दुसरे तोपखाना पोलीस ठाण्यात नोंदवले गेले. नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला उघडपणे धमकी दिली, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैंगबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. अहमदनगरमध्येदेखील मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणेदेखील सहभागी झाले होते. नितेश राणेंचे विधान सोशल मीडियात चर्चेत राहिले. यानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी व्हिडीओ शेअर करुन नितेश राणे धार्मिक हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप केला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.