मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाले असले तरी पालकमंत्रिपद आणि खातेवाटपावरुन नेते नाराज आहेत. तर निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील मित्रपक्ष एकमेकांवर नाराज आहेत. यामुळे राज्यामध्ये नवीन आघाडी पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना व भाजप पक्षाची पुन्हा एकदा राज्यामध्ये युती होण्याचे संकेत समोर येत आहेत. या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील युतीवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून भाजप व शिवसेना नेत्यांची जवळीक वाढत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. भाजप व शिवसेनेमध्ये प्रचारामध्ये झालेल्या तफावत आता नरम होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये त्यामुळे नवीन आघाडी निर्माण होण्याबाबत संजय राऊतांनी सूचक विधान केले आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात कुजबुज झाली होती. त्यानंतर शिवसेना-भाजप युती झाली म्हणजे तो सुवर्णक्षण असेल, असे उत्तर भाजप नेते चंद्रकांत पाटील दिले होते. त्यामुळे आता शिवसेना उबाठा आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. युतीचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवसे-नवसे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही. आम्ही एकत्र २५ वर्ष चांगले काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी अगदी एकमेकांविरोधात भूमिका घेतली होती. आता निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधील शत्रूत्व कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही युती तोडण्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की,” दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. आम्ही तेव्हा हिच मागणी केली होती. परंतु अमित शाह यांनी ही ती मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. आता पुन्हा अनेक लोकांना भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे वाटत होते. आता येत्या काळात काही घडमोडी घडणार आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेना उबाठामधील अनेक लोकांना युती व्हावी, असे वाटते.” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.