नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत या दोन्ही राज्यांत प्रचाराचा धुरळा उडतांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या दोन्ही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंड विधानसभेच्या निवडणुकीबाबत माहिती देतांना सांगितले की, झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. त्यामुळे झारखंडमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच झारखंडमधील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी २८ ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी ही ३० ऑक्टोबर रोजी होईल, असे त्यांनी म्हटले.
निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की,पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३० ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्य्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तर झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हे १३ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे, असेही राजीव कुमार यांनी म्हटले.
तसेच झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा असून एकूण २ कोटी ६ लाख मतदार आहेत.तसेच झारखंडमध्ये २९ हजार ५६२ मतदान केंद्र राहणार असून यातील २४ हजार ५२० बूथ ग्रामीण भागात असतील, असेही राजीव कुमार म्हणाले. दरम्यान २०१९ साली झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, यंदा याठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे.