महाराष्ट्रराजकारण

शिंदे गटाच्या नाराजीतच भाजपकडून शपथविधीची जय्यत तयारी, मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स

मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीची नवी तारीख समोर येताच भाजपकडून शपथविधीची जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसतंय. महायुतीचा सरकारचा हा शपथविधी भव्य स्वरुपाचा असणार आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्रीपदाबाबत आणि मंत्रिमंडळ खातेवाटपाचा सस्पेन्स कायम आहे. भाजपकडून आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली नाही.

या शपथविधीसाठी भाजप पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा शपथविधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. यावेळी मुख्य मंचावर शपथविधी, दुसऱ्या मंचावर साधू-महंत तर तिसऱ्या मंचावर संगीत असा भव्य कार्यक्रम असणार आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्यांनाच देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल.

शिंदे गट अद्यापही नाराज
आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदानावर सुरु असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदेसेनेचा एकही आमदार त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा झाली.

एकमेव पर्याय उपलब्ध
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याची लगीनघाई महायुतीतील नेत्यांना झाली आहे. त्यामुळे आधी वानखेडे स्टेडियमनंतर शिवाजी पार्क मैदान, तर बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान याची चाचपणी झाली. मात्र बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान आधीच बुक करण्यात आले आहे. तर शिवाजी पार्क मैदानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंडप, स्टाॅल उभारणी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात ही महायुतीचा शपथविधी सोहळा होणे अशक्य झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button