देश-विदेशभारत

दिल्लीतील 40 हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; 30 हजार डॉलर्सची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील अनेक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये एक आरके पुरममधील आणि दुसरी पश्चिम विहारमधील, मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूल यासह अनेक शाळा समाविष्ट आहे. या मिळालेल्या धमकीनंतर शाळा प्रशासनाने मुलांच्या जिवाची काळजी घेत सर्वांना घरी पाठवले आहे.

दिल्लीत आज 40 हून अधिक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. मेलमध्ये लिहिले आहे – “मी शाळेच्या इमारतींच्या आत अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय चांगले लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु बॉम्बचा स्फोट झाल्यावर बरेच लोक जखमी होतील. 30,000 अमेरिकन डॉलर्स मला मिळाले नाही तर मी बॉम्बचा स्फोट करीन.

यापूर्वीही मिळाल्या धमक्या
दिल्लीतील शाळेला बॉम्बची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही अनेकवेळा असे प्रकार उघडकीस आले आहेत. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2024 रोजी डीपीएस आरकेपुरमच्या मुख्याध्यापकांना शाळेत बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मे महिन्यातही अनेक शाळांना पुन्हा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आणि दिल्ली पोलीस आयुक्तांच्या मेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला.

दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी बॉम्बच्या धमक्यांची मालिका संपत नाही, हे विशेष. काही काळापूर्वीही दिल्लीतील रोहिणी येथील एका खासगी शाळेला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. यानंतर दिल्ली अग्निशमन विभागाचे एक पथक तपासणीसाठी शाळेच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि धमकीची अफवा आढळून आली.

रोहिणीच्या शाळेला धमकी देण्याच्या एक दिवस आधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता, त्यात एक जण जखमी झाला होता. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छोट्या स्फोटानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते.

यापूर्वी दिल्लीतील रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेजवळही स्फोट झाला होता. दोन महिन्यांत दिल्लीत असे दोन स्फोट झाले आहेत, त्यामुळे आता येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढेच नाही तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्याही आल्या आहेत, त्या तपासानंतर खोट्या सिद्ध झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button