फडणवीसांनी शब्द पाळला… कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची हजेरी
अहिल्यानगर : 2016 च्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडितेच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत आपला शब्द पूर्ण केला.
देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता शब्द
कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना फडणवीस यांनी त्यावेळी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आपली असेल आणि लग्नालाही उपस्थित राहीन, असं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांनंतर समारंभाला उपस्थित राहून दिलेलं आश्वासन पाळलं आहे.
याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “शब्दांचे पक्के… असे आहेत आमचे नेते…आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पांळणारा…या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
काय आहे कोपर्डी प्रकरण
दरम्यान, 13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.