दलित असल्याने राज्यसभा खासदाराला मंदिरातून हाकलले
मुंबई : पद्मभूषण तसेच पद्मविभूषण असलेले राज्यसभा खासदार इलैयाराजा हे जातीय भेदभावाला बळी पडले. तामिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर येथील अंडाल मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. इलैयाराजा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९४३ रोजी तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील एका दलित कुटुंबात झाला.
तामिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर येथील अंडाल मंदिरात प्रसिद्ध संगीतकार आणि राज्यसभा खासदार इलैयाराजा यांच्या विरोधात जातिभेदाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना मंदिरातील मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापासून रोखलं. यानंतर त्यांना तेथून बाहेर काढण्यात आलं. अक्षरश: त्यांना पुजाऱ्यानी मंदिरातून हाकलून लावले.
दलित असूनही आपल्या कर्तत्वाने कमवले जगभरात नाव
इलैयाराजा त्यांच्या संगीतासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यांनी ७००० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत. याशिवाय वीस हजारांहून अधिक मैफलींमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. ते “इसैग्यानी” या टोपण नावाने ओळखले जातात.
इलैयाराजा यांना शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०१२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ते लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शास्त्रीय गिटार वादनात सुवर्णपदक विजेते आहेत.