उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अिधवेशनास हजेरी लावली. तसेच त्यांनी विधानपरिषदेच्या कामकाजात देखील सहभाग घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोघांमध्ये जवळपास ६ ते ७ मिनिटे चर्चा देखील झाली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ठाकरे या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती होती. त्यानंतर आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीनंतर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत”,असे त्यांनी म्हटले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका
उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले.
उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.