निकष न लावता लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या : ठाकरे
नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी कोणतेही निकष लावले नाही, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावता? लाडक्या बहिणींना २१०० रुपये त्वरित द्या, ” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारला सवाल विचारले. आधी कोणतेही निकष लावले नव्हते, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावताय? आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, “यापूर्वी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होतं. निवडणुकीचा निकाल सर्वांनाच अनपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना ईव्हीएम सरकार म्हटले जाते. ईव्हीएम सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. जनता नाईलाजाने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा करत आहेत. काही गावांमध्ये निकालाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. मंत्रीपद ज्यांना मिळाले त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार जास्त मोठ्याने वाजत आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
लाडकी बहीणीवरुन उध्दव ठाकरेंचा निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही. महायुतीने सरकार स्थापन केले आहे. सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती. आता लाडक्या आमदारांची चर्चा सुरू झाली आहे. पण, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्थगिती आणली.” या सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू झाली आहे. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेवर काही निकष लावणार, अशा बातम्या येत होत्या. आता हे निकष बाजूला ठेवून तत्काळ लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावे. आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपयांनी थकीत पैसे द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. “एक प्रथा असते नवीन मंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय करून देत असतात. पण मला वाटतं पहिली वेळ असेल ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांचा मुख्यमंत्र्यांना राज्याचे मंत्री म्हणून परिचय करून द्यावा लागला, हे दुर्दैवी आहे. आम्ही २० आमदारांसह सरकारसमोर उभे आहोत. महायुतीला राक्षसी बहुमत असूनही अजून खातेवाटप करण्यात आले नाही. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावरही अधिवेशनात कोणताही मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाही,” असा आरोप ठाकरे यांनी केला.
अधिवेशनावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, “जर खातेवाटपच झाले नाही, तर हे अधिवेशन कशासाठी आहे? अधिवेशन गमंत म्हणून सुरू असेल, तर ही गंभीर बाब आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत मला वाईट वाटते. या सरकारची अवस्था अत्यंत वाईट आहे.”
निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे
लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाल्याशिवाय ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेवर पुढे जाणे योग्य ठरणार नाही. वन नेशन वन इलेक्शन हे विषय अदानीसारखे विषय बाजूला करण्यासाठी आहे. तुम्ही एका गावाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला का घाबरता? लोकशाहीची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे,” असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.