विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे
नागपूर : येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या सभापतीपदीसाठी केवळ एकच अर्ज आला होता. त्यामुळे राम शिंदे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.
महाविकास आघाडीने या पदासाठी उमेदवार जाहीर केला नव्हता. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे देखील या पदासाठी इच्छुक होत्या. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून देखील हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपने हे पद स्वतःकडेच ठेवले आहे. याआधी विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली होती.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती निवड करण्यासंदर्भातील प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो, आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींती निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधा पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचेदेखील आभार मानतो.
“प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. यापूर्वी देखील ना. स. फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला. मला विश्वास आहे की आपणही तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही”.
रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत : एकनाथ शिंदे
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण दोघे शिंदे आहोत, त्यामुळे काही अडचण नाही. रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत. सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत. नावात राम आणि आडनावात शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांच ऐकून घेतील. आणि काम पण करतील.
गिरीश महाजनांना अजित पवारांचा टोला
अजित पवार म्हणाले की, या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहील तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे. मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझा इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला अस आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं वाटलं असतं तर गिरीशच मंत्रिपद गेलं असतं, असा टोला त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना लगावला.