…तर ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील : विनायक राऊत
मुंबई : लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाली तर ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते छगन भुजबळ यांनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांनी स्वत: हून आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंडासह रक्कम वसुल केली जाईल. त्याच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाने ही प्रतिक्रिया दिली आहे.
“योजनेचे नियम काही वेगळे असतात. आता एका घरात दोन महिलांना लाभ देता येत नाही. तसेच एखाद्याच्या घरी चारचाकी गाडी असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही. मात्र, गरीबांना लाभ मिळायला हवा. असा या योजनेचा उद्देश आहे. पण जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपलं नाव काढून घेतलं पाहिजे. याबाबत लोकांना अवाहनही केलं पाहिजे. आता योजनेच्या माध्यमातून जे पैसे दिले गेले आहेत, ते पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे दिले गेलेले पैसे पुन्हा घेण्यात येऊ नये. मात्र, यापुढे सांगितलं पाहिजे की, नियमात बसत नाही त्यांनी स्वत:हून आपले अर्ज काढून घ्यावीत. त्यानंतर जर त्यांनी आपले नावे काढून घेतले नाही, किंवा अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली कररण्यात येईल” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.
लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेवर राऊत म्हणाले, ‘केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले नाहीत. तर या नव्याने चौकशी झाल्यानंतर साठ लाखांहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील’, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, ‘शिर्डीमधील त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात येऊन त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोलावं लागतं, याचाच अर्थ राज्यात उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात वर्चस्व आहे हे मान्य करावं लागेल. राज्यातील इतर घटनांवर न बोलता फक्त टीका करतात. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील, तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं’.
यावेळी आगामी महापालिका निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं राऊत पुढे म्हणाले.
‘सुरेश धस यांनी बीडमधील प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडे यांचा पापड होत असेल, तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.