विचारधारा सोडली तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र : रोहित पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच काही कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. अशातच आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. नाशिकमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, “कुटूंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटते, मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येणे अवघड आहे. एका पक्षाला विचार सोडावे लागतील तरच दोन्ही पक्ष एकत्र होतील. शरद पवार एक विचार घेऊन पुढे जात आहेत तर अजित पवार दुसरे विचार पुढे घेऊन जात आहेत. मात्र, शरद पवार आणि अजितदादा मोठे नेते असून ते याबाबत निर्णय घेतील”, असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात विविध कंपन्यासोबत केलेल्या करारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. ते म्हणाले की,”ज्या कंपन्यांशी करार झाले आहेत, यातील बहुतांशी कंपन्या मुंबई, पुणे आणि ठाणे येथील आहेत. मग त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय होती? हे करार तर महाराष्ट्रात देखील करता आले असते. महाराष्ट्रात हे करार केले असते तर ते लोकांना जास्त आवडले असते, असा टोला त्यांनी लगावला. तसेच आता ज्या कंपन्यांशी करार झाला आहे, त्या कंपन्या चांगल्या आहेत. मात्र, त्या करारांची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न आमदार पवार यांनी उपस्थित केला.