अहमदाबाद : अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले. अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या मैदानावर आयोजिलेल्या हिंदू आध्यात्मिक परंपरा आणि सेवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. भारताने शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.
भैयाजी जोशी यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केले. यावेळी बोलताना भैयाजी जोशी यांनी, “हिंदू नेहमीच धर्मरक्षणासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आवश्यक ती प्रत्येक गोष्ट करावी लागेल. इतर लोक ज्या गोष्टींना अधर्म म्हणतात अशा गोष्टी देखील कराव्या लागतील. आपल्या पूर्वजांनी देखील अशा अनेक गोष्टी केल्या आहेत”. जोशी यांनी यावेळी उपस्थितांना महाभारताचे दाखले दिले. पांडवांनी अधर्म संपवण्यासाठी युद्धाच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं होतं,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना भैय्याजी जोशी यांनी,“हिंदू धर्मात अहिंसा सर्वोच्च स्थानी आहे. मात्र कधी कधी आपल्याला अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसेचा मार्ग अवलंबावा लागतो. अन्यथा अहिंसा ही कल्पना देखील सुरक्षित राहणार नाही. आपल्या महान पूर्वजांनी आपल्याला हाच संदेश दिला आहे. भारतातील जनतेला शांततेच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल. अहिंसेच्या मार्गानेच आपण शांतता प्रस्थापित करू शकतो”.असेही त्यांनी म्हटले.
भैय्याजी जोशी म्हणाले, “कोणताही धर्म लोकांना आपापल्या धर्माचं पालन करू देत नसेल तर देशात शांतता प्रस्थापित होणार नाही. जगाच्या पाठीवर भारताव्यतिरिक्त असा कोणताही देश नाही जो इतर सर्व देशांना आपल्याबरोबर पुढे घेऊन जाण्यास सक्षम असेल. आपणच जगाला वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना दिली आहे आणि ही भारतीय अध्यात्माची संकल्पना आहे. आपण आणि जगभरातील प्रत्येकानेच संपूर्ण जगाला कुटुंब मानलं तर संघर्ष होणारच नाही”.
तसेच पुढे बोलताना भैयाजी जोशी यांनी,”भारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे होणारा हा परिवर्तनाचा प्रवास समाज, राष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा आहे. देश, जगासमोर सन्मान वाढविण्याची संधी भारत देशाला मिळणार आहे. आपल्या मूळ हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला तर भारत सुपरपॉवर नव्हे तर सुपरराष्ट्र होणे आवश्यक आहे, असे भैयाजी जोशी म्हणाले.