एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा
बीड : केज तालुक्यातील मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय सातत्यानं लावून धरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहीत आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला.
करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत धस यांनी खळबळजनक दावा केला आहे.
‘करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्ती होती. साडी नेसून त्यानं करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं. त्याचं नावसुद्धा मला माहीत आहे. पण ते तुम्हाला सांगणार नाही. त्याचं नाव मी पोलीस अधीक्षकांना सांगेन,’ अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
काय-काय म्हणाले सुरेश धस?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मिक कराड यांनी केली होती, म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत. गडचिरोलीतील एकाची बदली वाल्मिक कराड यानी करून आणलेले आहे. गडचिरोलीतील बदली करून आणलेल्याने त्याची स्वामिनिष्ठा त्याने दाखवू नये. काही लोक अतिशय संपर्कात आहेत. ते देखील पुढे आले आहे. त्याचबरोबर करूणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती देखील दुसरी, तिसरी कोणी नसून ती बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील व्यक्ती होती. त्याचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र, ते बाहेर मी सांगणार नाही. मी एसपींना सांगेन. पोलिस दलामध्ये असे काही लोक असतील तर, चार ते पाच लोकांवर काही आक्षेप नाही. मात्र, खालचे काही पोलिस आणि अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आक्षेप आहे, त्यांच्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे, ते बोलले त्याबाबतची सर्व माहिती काढा, मी ती सर्व माहिती घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे, असे माध्यमांसमोर बोलताना सुरेश धस यांनी म्हटले आहे.
नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा
सुरेश धस म्हणाले, करूणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल आकाच्या सांगण्यावरून तो पिस्तुल ठेवण्यात आलेला होता. यावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. पोलीस दलात बिंदू नामावली प्रमाणे माहिती घेण्यासाठी पत्र दिले आहे. बिंदू नामावलीप्रमाणेच जिल्ह्यात कर्मचारी राहणार अशी मागणी त्यांनी केली आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांनी पदावर राहावे असे मला वाटत नाही, एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री राहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्री पदापासून बाजूला करावे असे मला वाटते, आणि ही सर्व जनतेची भावना आहे.
परळीत असताना गाडीत सापडले होते पिस्तूल
करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा करूणा शर्मा यांच्या भोवती लोकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर करूणा शर्माच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वैद्यनाथ दर्शनासाठी करूणा मुंडे गेल्या असता या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का?, असा प्रश्न करत परळीच्या महिलांनी करूणा मुंडेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि करूणा मुंडे यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून तपास करण्यात आला होता.