दोन-चार टक्के भ्रष्टाचार होतोच, या कृषीमंत्री कोकाटे यांच्या विधानानंतर अजित पवारांचे मंत्र्यांना ताकीद
महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन महिनाभराचा काळ लोटला आहे. त्यातच मंत्र्यांना त्यांचे खातेवाटप देखील करण्यात आले आहे. खातेवाटपानंतर आता सत्ताधारी नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर येताना दिसून येत आहे. राज्यातील पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य करताना कोणत्याही योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार होतोच, असे वक्तव्य करुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नवा वाद निर्माण केला होता.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल (मंगळवारी) माध्यमांशी बोलतांना “एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय नाही. काही गैरप्रकार झाले आहेत, ९६ सीएससी केंद्रावर गोंधळ झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, जिल्हाधिकारी फौजदारी कारवाई करतील. साडे चार लाख अर्ज रद्द केले असून बीडमध्येच नाही तर अनेक जिल्ह्यात असा प्रकार झाला आहे. त्यामुळे योजनेत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असून कुठल्याही योजनेत २ ते ४ टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असे नाही, असे विधान केले होते. यावरून कोकाटे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
त्यानंतर आज (बुधवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत मंत्र्यांना सक्त ताकीद देत सूचना केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांनी “मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे सरकारच्या पॉलिसीबाबत बोलू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच सरकारी योजना व आगामी विविध धोरणांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच संबंधित विषयांवर बोलतील, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होतील अशी वक्तव्ये करणे टाळा, अशा सूचनाही पवार यांनी मंत्र्यांना केल्याचे समजते.
दरम्यान, कोकाटे यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “कोणत्याही योजनेत २ ते ४ टक्के गैरव्यवहार होतच असतो हे मंत्र्यांचे विधान धक्कादायक आहे. भ्रष्टाचाराला राजमान्यता देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराला उघडपणे पाठिंबा दोणारे कोकाटे हे पहिले कृषिमंत्री आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तसेच प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर सध्या पालकमंत्रिपदाचा महत्वाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या या सरकारसाठी सध्यातरी किरकोळ ठरत आहेत, अशी टीकाही आव्हाड यांनी केली होती.