महाराष्ट्र

बांगलादेशी महिलांही सरकारच्या लाडक्या बहीणी, घेतला योजनेचा लाभ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमधील नियम आणि अटींवर बोट ठेवत अपात्र महिलांना नावं मागे घेण्यास सांगण्यात येत आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशी घुसखोर महिलेने घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी महिलेने मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. सरकारकडून तिला लाभही देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील कामठीपुरा येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. महादेव यादव या ३४ वर्षीय एजंटलाही या बांगलादेशी व्यक्तींना आश्रय देणे आणि रसद पुरवण्याचा ठपका ठेवत अटक केली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेचे नाव उर्मिला खातुन असे असून ती २३ वर्षांची आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरीच पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, ज्या महिलांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अटक करण्यात आलेल्या इतर बांगलादेशी नागरिकांची ओळखही पटली आहे. अटकेत असलेल्या बांगलादेशींची नावे जलाल शेख, अलीम रसूल अली आणि मोहम्मद ओसिकुर रहमान अशी आहेत. रहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केल्याचे, पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता २०२३, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, १९५०, परदेशी कायदा, १९४६ आणि परदेशी आदेश, १९४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button