भास्कर जाधव ठाकरे गटामध्ये नाराज? शिंदे गटात प्रवेश करणार का? उदय सामंतांनी केलं स्पष्ट
शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या या विधानावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंतांची प्रतिक्रिया
“कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल की जे काही चाललंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चाललंय. शेवटी एक्स्ट्रीम टोक येतं, जेव्हा आपल्याला खात्री होते की इथं काँग्रेसचंच ऐकलं जातं किंवा काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष चालवला जातो, त्यामुळे भास्कर जाधवांचं हे मत बनलं असावं”, असं उदय सामंत म्हणाले.
काय म्हणाले होते भास्कर जाधव
चिपळूणमध्ये शिवसरेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर अनेक आरोप केले आहेत. यावेळी बोलताना, “जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं” असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी व्यक्त केली. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी मंचावर सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील उपस्थित होते.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते विनायक राऊतांनी जाधवांचा मुद्दा योग्य होता असे म्हणत पक्षातील भोंगळ कारभारावर बोट ठेवले. तर भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर पक्ष अडचणीत असताना थोडं संयमानं घेण्याची सूचना संजय राऊतांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाची भास्कर जाधवांना खुली ऑफर
एकीकडे दोन्ही राऊत बाजू सावरत असताना दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र भास्कर जाधवांना शिंदे गटात येण्यासाठी खुली ऑफरच देऊन टाकली. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत. भास्कर जाधवांना शिवसेनेत घ्यायचं की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत. आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार?
गेल्या काही दिवसात शिवसेनेत धूसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रत्नागिरीच्या राजापूरमधील राजन साळवींच्या नाराजीची चर्चा असो, किंवा मग महाविकास आघाडी सोडून स्वबळाची भाषा करणारी वक्तव्यं असोत. त्यामुळे आता शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत आता उद्धव ठाकरे सेनेचे काय होणार हा प्रश्न आपसूक चर्चेत येतोच. अशातच आता आता पक्षातूनच नाराजांनी सूर काढल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे हे पाहणे गरजेचे आहे.