महाराष्ट्रराजकारण

फडणवीस हे हतबल, लाचार मुख्यमंत्री; संजय राऊत यांची बोचरी टीका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद सुरू आहेत. अशामध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला विरोध झाल्यानंतर त्याना स्थगिती देण्यात आली. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला कात्रीत पकडले आहे. अशामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात बदल केला. एरवी कडक शिस्त, कठोर निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचाच निर्णय का बदलावा लागला? पालकमंत्रीपदासाठी इतका हौरटपणा का? पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे, ही त्या त्या जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवरून सुरू आहे. आर्थिक कारणांवरून ही मारामारी सुरू आहे, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला निर्णय बदलून ते हतबल, लाचार मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. हे सरकार दिल्लीतून चालेल, असे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या कळसुत्री बाहुल्या आहेत आणि त्यांच्या हाता-पायांना बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मुख्यमंत्री सरकारचा निर्णय घेऊन राज्यातील गुंडागर्दी, मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत असताना दिल्ली रस्त्यावर येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. पालकमंत्रीपदासाठी दंगल महाराष्ट्राने याआधी पाहिली नव्हती, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button