गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसाची भेट
![](https://policenews.online/wp-content/uploads/2024/12/ुुु.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथमच गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
गौतम अदानी हे दुपारी १२.०० च्या सुमारास देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर साधारण दीड तास गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी गौतम अदानी यांनी राज्यातील उद्योग, विकासकामे याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांबद्दलही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गौतम अदानी हे त्यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भाजप आणि गौतम अदानी यांचे कनेक्शन असल्याची विरोधकांची टीका
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरुन टीकेची झोड उठवली होती. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय, मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरूनही अदानी आणि भाजप यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते.
काँग्रेसकडून हिवाळी अधिवेशनात मोदी आणि अदानी समूह यांच्यातील संबंधांचा पुनरुच्चार
दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी संसदेत ‘मोदी अदानी भाई-भाई’ असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या.
तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संबंधांचा पुनरुच्चार केला होता. त्यासाठी त्यांनी एक छोटा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ संसदेच्या परिसरात बनवण्यात आला असून त्यात काँग्रेसचे खासदार शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान मोदींचा मुखवटा घातला होता. तर काँग्रेसचे मणिकम टागोर यांनी गौतम अदानी यांचा मुखवटा घातला होता. समोर उभे असलेले राहुल गांधी या दोघांना काही सवाल करत होते. यानंतर या व्हिडिओवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.