पुण्यात उतावळ्या उमेदवारांचे निकालाआधीच सेलिब्रेशन, म्हणे मीच जिंकणार
पुणे : महाराष्ट्रात एकूण ६५ टक्के मतदान झाले आहे. यंदा मागील वर्षीपेक्षा निवडणुकीमध्ये जास्त मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत असून दोन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला निकाल येणार आहे. मात्र पुण्यात निकालाआधीच विजयाचे पोस्टर्स लागले असून काहींनी विजयी रॅलीसुद्धा काढण्यात आलीये.
पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराच्या विजयाचे बॅनर, निकालाच्या आधीच जंगी मिरवणूक #punenews #VidhanSabhaElection2024 #SachinDodake #SharadPawar #MaharahstraElection2024 pic.twitter.com/tiF6VEVXIb
— Harish Malusare (@harish_malusare) November 21, 2024
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरासमोर अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर्स झळकल्याने चर्चा सुरू आहेत. निकालापूर्वीच शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये विजयाचा जल्लोषाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यात लढत झाली आहे. पुण्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघात महिला उमेदवार आहेत. याच मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली आहे.
निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मतदान झाल्यानंतर आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हे श्रमपरिहार करताना दिसत आहेत, हेमंत रासने यांनी मंडईतील मिसळ हाऊसमध्ये जाऊन मिसळीवर ताव देखील मारला आहे. रोजच्या मित्रमंडळींसोबत मिसळीचा आस्वाद घेताना ते दिसत आहेत. गेली पंधरा दिवस निवडणुकीची जी काही धामधूम होती, ताणतणाव होता त्यातूनं बाहेर पडून आज रिलॅक्स दिवस घालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसब्याचा आमदार मीच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ 2014 पासून भाजपचा किल्ला आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी 2019 साली काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 44.95 टक्के मतदान झाले आहे. मात्र, निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाचे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत.
खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर, मनसेचे उमेदवार मयुरेश रमेश वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोडके सचिन यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मात्र, निकालाआधी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढली आहे. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघातील उमेदवारांसह नागरिकांचं लक्ष्य निकालाकडे लागलं आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.