सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे अशी प्रसिद्धी पत्रक बीडच्या पोलीस ग्रुप वरती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी टाकले आहे. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणातले इतर आरोपी पोलिसांना सापडले, कृष्णा आंधळेला पोलीस शोधू शकलेले नाही.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत . कृष्णा आंधळे फरार घोषित करून माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .
जेव्हा कोर्टाकडून एखाद्या व्यक्तीला अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जातं, त्यानंतरही अनेकदा नोटीस बजावूनही ती व्यक्ती कोर्ट किंवा पोलिसांसमोर शरणागती पत्करत नाही, तेव्हा सीआरपीसीच्या कलम 82 अन्वये त्याला फरार घोषित केलं जातं. सामान्य भाषेत त्याला तडीपारही म्हटलं जातं. पण कायद्याच्या भाषेत त्याला फरार म्हटलं जातं. फरार घोषित केल्यानंतर आरोपीला 30 दिवसाच्या आत कोर्टात अपील करावी लागते. जर त्याने अपील करायला उशीर केला तर त्याला उशीर का झाला याचं कारणही द्यावं लागतं.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात हे प्रकरण तापलं, मात्र तरीही पोलिसांना अनेक दिवस या आरोपींना पकडता आलं नव्हतं. 31 डिसेंबरला स्वत: वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपीपी अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडले. मात्र, याच आरोपींच्या सोबत हा कृष्णा आंधळे होता अशी माहिती आहे. तरीही तो पोलिसांना सापडलेला नाही. विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात फरार होता अशीही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.
कराड याला 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी
वाल्मिक कराडला मकोकामध्ये वाल्मिक कराडला याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आज ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची पाटलांनी माहिती दिली. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे. बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.