महाराष्ट्र

वर्दीतील दर्दी व्यक्तिमत्व पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे

सदैव कर्तव्यदक्षतेचा ‘सूर्य’ सांगोला तालुक्यातही तेजोमय...

नविद पठाण : पोलीस न्यूज, सांगोला
निसर्गाचा दुष्काळाच्या रूपाने कायम कोप सोसणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील ‘मेंढागिरी’ या छोट्याश्या गावात जन्म असणाऱ्या आणि स्वतःच्या जिद्द व चिकाटीने आई- वडिलांचे नाव किर्तीमान करण्यासाठी भीमराय खणदाळे यांनी प्राथमिक शिक्षण गावातच घेतले. पुढे विजापूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण आणि शेवटी सांगली येथून उच्च शिक्षणातील बी.एससी. एल. एल. बी (एस.) पदवी घेतली. याच कालावधीत त्यांनी इतर ठिकाणी मिळेल ते काम केले. उच्च शिक्षण घेऊन पोलीस खात्याविषयी असणारी ओढ, त्याद्वारे फक्त पगार आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने न बघता, लोकांना न्याय मिळावा, समाज परिवर्तनामध्ये आपलाही सहभाग आणि कुटुंबाचा, गावाचाही नावलौकिक पिढ्यांपिढ्या राहावा म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची सन १९९५ मध्ये त्यांची निवड झाली.
प्रशिक्षण घेतल्यानंतर १९९६ मध्ये दहिसर (मुंबई ) येथे रुजू होऊन राज्याची राजधानी मुंबई व नागपूर अश्या अत्यंत महत्वाच्या शहारात पोलीस खात्यात विविध पदावर काम करत असताना, आपली कामाची अनोखी झलक दाखवत कौतुकास्पद कामगिरी केली. दुष्काळी पट्ट्यात जन्म झाला असला, तरी मनातील माणुसकीचा झरा मात्र कायम वाहत ठेवला.
पोलीस खात्यातील कामगिरीचा सूर्य कायमस्वरूपी तेजोमय ठेवत, विविध गुन्ह्यातील तपास कामात स्वतःच्या अंगीभूत गुणांनी नावाप्रमाणेच ‘भीम’ कामगिरी केली. पोलीस अधिकारी म्हटले अनेकांना कठोर काळजाचा माणूस अशीच प्रतिमा आठवते. एखाद्या सर्वसामान्य माणसाला कोणत्याही वशिल्याशिवाय न्याय मिळतो, तेव्हा मात्र पो. नि. भीमराय खणदाळे यांच्यातील खाकी वर्दीतील दर्दी माणूस आवर्जून दिसतो.
पोलीस खात्यातील नोकरीचा शेवटचा टप्पा आला असता, आपल्याच जन्मभूमी नजीकच्या दुष्काळी भागातील सांगोला पोलीस स्टेशनला दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी हरहुन्नरी पो. नि.भीमराय खणदाळे यांनी पदभार घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक म्हणजे एकप्रकारे प्रतिष्ठित बाब म्हणून बघितली जाते.
पृथ्वीवरील निसर्गाची हिरवळ बगून आकाशालाही हेवा वाटावा, हिमालयाकडे बगून पृथ्वीलाही आधार वाटावा, स्वतःच्या गर्भात हिऱ्यामोतीची खाण असूनही कधीही काळ्या आईला गर्व नसतो, त्याप्रमाणे पोलीस अधिकारी म्हणून भीमराया खणदाळे याचा कधी गर्व दिसला ना, कधी अहंकार दिसला. त्यांच्या कामातून दिसले ते फक्त पोलीस खात्याविषयी असणारी प्रामाणिकता आणि लोकांविषयी व पोलीस कर्मचाऱ्यांविषयीची आपुलकी.
सांगोला म्हणजे स्व. आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या उतुंग कार्यकर्तृत्वाचा वारसा असलेला ऐतिहासिक ‘सोन्याचा तालुका’ म्हणून ओळख, दुष्काळाशी झुंज देऊन डाळिंबासाठी जगभर प्रसिद्ध असणारा तालुका तर तालुक्यात असणारी सोन्यासारखी निर्मळ माणसं आणि बेरकी प्रवृत्तीपण तेवढीच. तालुक्यातील गतिमान विकासाबरोबरच बदलत्या काळाबरोबर निर्माण झालेली नवी आव्हाने स्वीकारत आपल्या कार्यक्षम गुणांमुळे पो. नि. भीमराय खणदाळे यांनी तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेचा ‘भीमरथ’ ओढण्याचे काम अगदी योग्य पद्धतीने केले.
सुमारे साडेतीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या तालुक्याचा भलामोठा विस्तार तीन बिट व चार दुरक्षेत्र असे असताना, अपुऱ्या पोलीस संख्याबळावर तारेवरची कसरत करत बगताबगता आपला वर्षपूर्तीचा कार्यकाळ पूर्ण केला.
ये तो दुनिया है, यहा भगवान के भी ऐब निकाले जाते है..! त्यामुळे साहजिकच काम करणाऱ्याकडेच ‘बोट’ केले जाते, शंभर चांगली कामे केली तरीही लोकं लवकर विसरतात आणि एक न कळत झालेली चूक मात्र डोंगरा एवढी केली जाते, शेवटी हत्ती चले अपनी चाल…..
सांगोला तालुक्यातील पोलीस स्टेशनचा कारभार म्हणजे ‘सोनेरी पण काटेरी मुकुट’ असे समजले जाते. लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि राजकीय उठाठेवीत योग्य पध्दतीने कर्तव्य पार पाडून लोकांचा पोलिसांवरील विश्वास टिकवणे सोपे नाही, तरीही तालुक्याचा त्यांनी केलेला कारभार पाहता पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांची कारकीर्द मात्र अनेकांच्या कायम आठवणीत राहील, हे मात्र नक्की.

मातृछाया हरवली, तरीही कर्तव्य बजावले….
सांगोला सारख्या ‘हायटेंशन’ विधानसभा निवडणुक कालावधीत योग्य नियोजन व परिश्रम घेऊन पो. नि.भीमराय खणदाळे यांनी निवडणूक शांततेत पार पडली. ऐन मतदानाच्या अगोदर आईचे निधन झाले असतानाही कौटुंबिक जबाबदारी पार पाडून मतदानाच्या दिवशीही आपली कर्तव्यनिष्ठाही पार पडली.

सामाजिक बांधिलकी; कडलास पुलाचे काम मार्गी
सांगोला – जत राज्यमार्गावर कडलास नजीक माणनदी वरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले होते. यासाठी अनेक मोठ्या राजकीय लोकांनी आंदोलने केली, पंरतु काम मात्र रखडलेले होते. वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे लक्ष्यात येताच पो.नि.भीमराय खणदाळे यांनी तात्काळ बाधित शेतकरी यांची समजूत काढून, तहसीलदार व बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांच्याशी संपर्क करून बैठक घेऊन पुलाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न मार्गी लावत सामाजिक बांधिलकी जोपासली.

सराईत आरोपींवर कारवाईचा ‘दणका’
गतवर्षी एम.पी.डी.ए. अ‌ॅक्ट – (एक प्रस्ताव चौकशीवर प्रलंबित) एकूण ०२, म. पो. अधिनियम कलम ५६ ब – व (२ प्रस्ताव चौकशीवर प्रलंबित) एकूण ०६ प्रस्ताव तडीपार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे – तडीपार (०२) , सी.आर.पी.सी. १४४ / बी.एन.एस.एस. १६३ प्रमाणे (५६) , सी.आर.पी.सी. ११०/बी.एन.एस.एस. १२९ प्रमाणे (७३ ), सी.आर.पी.सी.१०७ / बी.एन.एस.एस. १२६ प्रमाणे (२१४५) , सी.आर.पी.सी. १०९ / बी.एन.एस.एस.१२८ प्रमाणे (०७) , प्रोव्ही अँक्ट ९३ प्रमाणे (४७) , निर्भया पथकांने देखील मुंबई पोलीस अधिनीयम अंतर्गत ३२५ कारवाई, असे एकूण २,६६३ प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच वाळू चोरी, दारुबंदी, जुगार, गुटखा अशा अवैध्यधंद्यावर ३१७ गुन्हे दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button